शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

मराठवाडा माझा.....मराठवाडा गीत

। क । वि । ता ।
______________

मराठवाडा माझा......

चळवळीचा वारसा सांगतो
विचार होऊन कानी घोंगतो
मराठवाडा माझा.....

भक्ती-शक्तीला पुजतो आहे
उदात्त उत्तमता भजतो आहे
मराठवाडा माझा.....

संतस्पर्शाने पावन झाला
देता येईल ते देत आला
मराठवाडा माझा.....

आद्यक्रान्तीच्या पेटल्या मशाली
दुष्काळासही विचारी खुशाली
मराठवाडा माझा.....

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
  मोबाईल-9923847269
--------------------------------------
पूर्वप्रसिद्धी-
दैनिक पुण्यनगरी
17सप्टेंबर 2015
---------------------------------------
माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी 
क्लिक करा
suryakanti.blogspot.com

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

रानकवी ना. धों. महानोरयांना भावपूर्ण श्रध्दांजली!


रानकवी ना. धों. महानोर
यांना भावपूर्ण श्रध्दांजली!!

गांधारीचेही आटले डोळे, 
मूक झाली पळसखेडची गाणी. 
रानातल्या कविता गाते, 
आज व्याकूळ अजिंठ्याची लेणी.

जगाला प्रेम अर्पावे म्हणीत, 
आली दिवेलागणीची वेळ, 
या शेताने लळा लाविला, 
संपून गेला जिवंत शब्दखेळ,

सैरभैर झाले पक्ष्यांचे थवे, 
त्या आठवणींचा झाला झोका! 
निसर्गाच्याही काळजाचा,
आज चुकला असेल ठोका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) 
 मोबा. 9923847269
--------------------------
वात्रटिकांचे रोजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर आपोआप मिळण्यासाठी माझ्या *सूर्यकांती*  कम्युनिटीमध्ये  खालील लिंक वर क्लिक करून जॉईन होऊ शकतात. पोस्ट वाचाव्याआणि बघाव्या लागतील
कोणालाही कसलीही पोस्ट करता येणार नाही याची नोंद घ्यावी.मान्य असेलच इथे सामील व्हा. https://chat.whatsapp.com/GuS56N0ivoeHIwXIqoqllW-
- सूर्यकांत डोळसे 
3ऑगस्ट 2023

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

प्रिय पुस्तकांनो..

कविता
-----------------------
प्रिय पुस्तकांनो..
कळायला लागल्यापासून
मी तुमच्याशी खेळतो आहे,
तुमच्या कुशीत लोळतो आहे,
तुमच्यामुळेच मला,
जगण्याचा खरा अर्थ कळतो आहे.
तुम्ही मला युक्ती दिलीत,
तुम्ही मला शक्ती दिलीत.
तुम्ही मला भक्ती दिलीत,
अनिष्टावर घाव घालायला
तुम्हीच हाती सुक्ती दिलीत.
तुम्ही मला नवी दृष्टी दिलीत,
तुम्ही तुमची सृष्टी दिलीत.
ज्ञानाच्या वृष्टीसोबत
जे जे उदात्त, जे जे उत्तम
याला सतत पुष्टी दिलीत.
तुम्ही माझी छाया बनलात,
तुम्ही माझी काया बनलात.
वैचारिक पाया बनून
जग कोरडे वाटले तेंव्हा
तुम्हीच खरी माया बनलात.
रंग-रूप बदलले तरी
बदलण्यावर जाऊ नका,
कधीही नाराज होवू नका,
मी तर देणारच नाही,
पण तुम्ही अंतर देवू नका !
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबा. ९९२३८४७२६९
जागतिक
पुस्तक दिनाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
-सूर्यकांत डोळसे