गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

हे आयुष्या...कविता

हे आयुष्या...
स्वत:साठी जगलो नाही,
स्वत:साठी जगणार नाही.
गमाईशी नाते माझे,
कमाईचे खाते बघणार नाही.
कधी झुकलो नाही,
कधीच झुकणार नाही.
वाट्टेल ती किंमत मोजून,
घेतला वसा टाकणर नाही.
हे आयुष्या,जे दिले तू मला:
त्यात कुठे कशाची कमी आहे?
तरी ना घरचा,ना दारचा,
ही जखम अश्वत्थामी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
10नोव्हेंबर2022

 

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

ग्रेस

ग्रेस
हे शब्दांच्या महाराजा,
तु नाकारलेस...
तुला दूर ठेवणारे.
भंपक, दांभिक,
अन तोंडदेखलेपणाला तु शिवला नाहीस.
तुझ्यातला कलंदरपणा माझ्यात उतरला..
हा वारसा जपतोय मी...
तु मला दहावीच्या मराठीत
'चिमण्या' घेऊन भेटलास
तेंव्हापासून पासून
तुझा शब्द काळजात.
कोरून ठेवीन.....
कविता कविची कमाई
नसते.
तुझ्यातला वारा नाही समजला..
समजणारही नाही.....
हे महाकवी
तु कवितेसकट 'तु अन
मोत्यांच्या अक्षरांसकट
माझ्यात उतरलास...
आता जबाबदारी माझी.....
कविता समजत कशी नाही ?
असा सवाल तुच करू शकतोस !
प्रशस्ती आणि पुरस्कारांसाठी
झुरला नाहीस....
कारण तु म्हणजेच
एक साहित्य अकादमी आहेस.......
याचा अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी
आणि
उजाडता पाठीवर ओझे वाटेपाशी तुझे डोळे यावे डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेठी !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबा. ९९२३८४७२६९
26 मार्च 2012

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

आई सिंधूताईसाठी...

आई सिंधूताईसाठी...

पोरक्या वासरांसाठी
हंबररणारी गाय गेली.
सिंधुताई गेल्या म्हणजे,
अनाथांची माय गेली.
अनाथ आणि सनाथांच्या,
काळजाला हा चरका आहे.
वत्सल गायीचा गोठा,
असा एकाएकी पोरका आहे.
सायीविना दूध उघडे,
दुधावरची साय गेली !
सिंधुताई गेल्या म्हणजे,
अनाथांची माय गेली!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
4जानेवारी 2022
-----------------------------------