रविवार, १५ जानेवारी, २०१७

नामदेवराव....



नामदेवराव....
तू
या दुनियेचे छिनालपण
आणि
बकालपण
सोलून दाखवलेस.
आणि कवितेला
कोणत्याच भाषेचा
विटाळ नस्तो
हे बिनधास्तपणे शिकवलेस.

हो मी केलीकॉपी तुझी
कारण तिच्यात
एक नशा आहे.
तुझ्या रांगड्या भाषेत
जग उलथून टाकण्याची
नेमकी दिशा आहे.

नामदेवराव,
माझ्यात तुझी
१ टक्का झलक
दिसली तरी
तू माझ्या
रक्तात भिनला आहेस
याचा अभिमान वाटतो.

माझ्यात येवू दे
तूझी ती पँथरजडीत
विनम्रता
जिने केले कौतुक...
ठासला दारूगोळा
योग्य
आणि नेमक्या वेळी.

नामदेवराव....
तू नव्हतास
वांझोटा कवी,
तू नव्हतास वांझोटा कार्यकर्ता !
म्हणून तर
तुझा वारसा
आजही धुमसतोय
वाडी-वस्ती
आणि महानगरा-नगरात !

नामदेववराव....
तुझ्या शब्दातली
आग जेवढी खरी.
त्यातली
आर्द्र्ता तेवढीच खरी !

नामदेवराव...
इथला प्रत्येक
रंजलेला-गांजलेला
इथला प्रत्येक
अडलेला-नडलेला
इथला प्रत्येक
नाकारलेला-ठोकारलेला
इथला प्रत्येक
धुसमूसणारा
इथला प्रत्येक
फुसफुसणारा
असतो जिवंत
नामदेव ढसाळ !!

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
१५जानेवारी२०१७
 --------------------------
 माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा..
https://surykanti.blogspot.in/

रविवार, ८ जानेवारी, २०१७

मॉंसाहेब आम्हांला माफ करा


मॉंसाहेब आम्हांला माफ करा

















क।वि।ता

मॉंसाहेब आम्हांला माफ करा

विसरून गेलोत इतिहास 
आम्ही विसरून गेलोत पराक्रम 
आमच्या डोक्यात पाणी झालेय 
त्याची तेवढी वाफ करा.
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा
तेच बोंबलत हिंडत आहेत.
घराघरातल्या आजच्या जिजाऊ
सासवांसोबत भांडत आहेत.

हे सारे बदलण्यासाठी
कुणातही टाप नाही. तुम्ही तेवढी टाप करा.
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....

घराघरातला शिवाजी
व्हिडीओ गेम खेळतो आहे.
जंक फुड खाऊन खाऊन
टि.व्ही.समोर लोळतो आहे.

घराघराचा कार्टून शो होतोय
हा बॅड शो तेव्हढा फ्लॉप करा
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
बाहेर खेळायला जावे तर
कुठे मावळ्यांचा पत्ता आहे?
साचलेल्या उकांड्यावरती
कावळ्यांचीच सत्ता आहे.

कॄपया , घर आणि डोक्यातले
उकांडे तेव्हढे साफ करा.
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
गनिमी काव्यासाठी तर
टि.व्ही.वाले लपलेले आहेत.
कोणताही चॅनल लावा,
सारे खानच खान टपलेले आहेत.

आमच्या चिकटलेल्या डोळ्यांची
जरा उघडझाप करा.
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
केस तेव्हडे वाढलेले,
पोकळ मात्र मस्तकं आहेत.
फार थोडी घरं सापडतील,
जिथे मुलांसाठी पुस्तकं आहेत.

आम्ही पापाचेच वाटेकरी
तरी होईल तेव्हढे पाप माफ करा 
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
राम-कृष्णांचा वारसा सांगुन
पुढच्या गोष्टी तुम्हांला
अगदी सोप्या करता आल्या.
इथली इरसाल लेकरं सांगतील,
आई-बापांच्या सहकार्यामुळेच
आम्हांला कॉप्या करता आल्या.

आई-बापांचेही खरे आहे,
कशाला म्हातारपणी ताप करा?
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
तुमच्यासारखी आई असली की,
लेकरांना आपोआप 
स्वराज्याची शपथ घ्यावी लागते.
आज मात्र बळजबरीने पकडून,
कॉप्या न करण्याची शपथ द्यावी लागते.

आई-बापांचेही खरे आहे,
कशाला म्हातारपणी ताप करा?
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

तुमच्यासारखी आई असली की,
लेकरांना आपोआप
स्वराज्याची शपथ घ्यावी लागते.
आज मात्र बळजबरीने पकडून,
कॉप्या न करण्याची शपथ द्यावी लागते.

पुन्हा गुरुजी चुकले तर
त्यांच्या हाताचे काप करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

आंधळ्या परंपरेचे
इथे सगळे पाईक आहेत.
कित्तीही ओरडून सांगा,
सारे बहिरोजी नाईक आहेत.

किटलेल्या कानातला मळ
तेल ओतून साफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

राजेपद वारसा हक्काने मिळते,
पण शिवबा घडवावा लागतो.
जाणतेपणाचा दुर्मिळ गुण
दागिण्यासारखा जडवावा लागतो.

जरा मर्यादा सोडून वागतोय,
संभाजीसारखा नातू मागतोय.
आम्हांला तुमच्यासारखी आई,
शहाजी राजांसारखा बाप करा
माँसाहेब, आम्हाला माफ करा

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
..................
पूर्वप्रसिद्धी-
दै.पुण्यनगरी /दै.झुंजार नेता

सोमवार, २ जानेवारी, २०१७

सावित्रीचा वसा

















सावित्रीचा वसा

 ज्योतीबांची सावली बनुन
’यशवंत’ उभा करणे,
हा सावित्रीचा वसा आहे
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥धृ॥
सावित्री पोरीसारखी पोर होती,
सावित्री बाईसारखी बाई होती.
जेंव्हा रोग कळला,
रोगावरचा विलाज कळला,
तेंव्हा सावित्री दाई झाली,
तेंव्हा सावित्री आई झाली.
एकूणच सगळा प्रकार असा आहे
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?....॥१॥
चार भिंतीतला संसार
सावित्रीलाही करता आला असता.
’हम दो,हमारा एक’चा हट्ट
सावित्रीलाही धरता आला असता.
सत्यवादी सावित्री सरळ असली तरी
कर्मठ आणि दांभिकांच्या
गळ्यातला फासा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥२॥
ना शिकता सवरताही
संसाराची गाडी धकली असती.
सासर नावाच्या आभाळाला
सावित्री कशाला मुकली असती?
सावित्रीने केलेला विचार
आपण कशाला करू शकतो?
कारण तुमच्या आमच्या डोक्यात
भरलेला भुसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥३॥
घरात उभी गेलेली सावित्री
वेळोवेळी उभ्या उभ्या बाहेर आली.
ज्योतीबा नावाच्या योद्ध्याची
सावित्री वेळोवेळी ढाल झाली.
ती शिक्षणाचे दान देत राहिली,
ओढावून घेता येईल तेवढा दोष
ओढाऊन घेत राहिली.
आपला मात्र सदैवच
पसरलेला पसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥४॥
दगडाला भ्याली नाही,
शिव्या-शापालाही भ्याली नाही.
सावित्री नावाचे वाघिण
शेळी कधीच झाली नाही.
तुम्ही आम्ही शेळपट
सावित्री मात्र वाघिण होती,
कारण ज्योतीबाच तसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥५॥
सावित्रीलाही नटता आले असते,
सावित्रीलाही मुरडता आले असते.
अव्यवहारी नवरा म्हणून
ज्योतीबाला खरडता आले असते.
लष्कराच्या भाकर्‍या कशाला भाजता?
असे ओरडता आले असते.
पण सावित्रीचा धर्म
सांगा कुठे तसा आहे?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥६॥
सगळ्या कुलूपबंद व्यवस्थेची
शिक्षण हीच चावी होती.
ज्योतीबांना सावित्री मिळाली,
त्यांना जशी हवी होती.
सावित्री उर्जेची जन्मदात्री होती,
सावित्री कवयित्री होती.
आपला जोडा आहे का?
सावित्री-ज्योतीबाचा जसा आहे?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥७॥
सावित्री ज्योतीबांच्या सत्यधर्माची
जित्ता-जागता आरसा होती.
सावित्री ज्योतींच्या सत्यधर्माचा
जित्ता-जागता वारसा होती.
सावित्रीने दिलेली ललकार
आपल्याला देता येईल?
कारण सावित्रीचा तो कंठ,
आपला तो घसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥८॥
तुमची आमची परीक्षा
सद्यस्थिती पाहते आहे.
ज्योतीबा आणि सावित्री
नसा-नसातून वाहते आहे.
ते हे बोलू शकत नाहीत
ते हे पेलू शकत नाहीत
ते संकटांना झेलू शकत नाहीत,
ज्यांच्या अंगोपांगी ससा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥९॥
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-९९२३८४७२६९
दैनिक झुंजार नेता | दैनिक पुण्यनगरी
३जानेवारी२०१७



रविवार, १ जानेवारी, २०१७

मी आलो आहे....२०१७ ची साद

मी आलो आहे....२०१७ ची साद
लुकलूकणार्‍या तार्‍यातून आलो आहे,भिरभिरणार्‍या वार्‍यातून आलो आहे.खोल खोल दर्‍यातून आलो आहे,उंच उंच खोर्‍यातून आलो आहे.
मांगल्याचा जयघोष करणार्‍यागगनभेदी भरार्‍यातून आलो आहे.झुळझुळणार्‍या झर्‍यातून आलो आहे,एवढेच काय?भल्या-बुर्‍यातून आलो आहे.
तुमच्या जल्लोषी स्वागतानेमी पुन्हा जिंदादिल झालो आहे....मी आलो आहे...मी आलो आहे......॥१॥
पाखंड्यांच्या टोळ्यातून आलो आहे,माणूसकीच्या होळ्यातून आलो आहे.असहिष्णूतेच्या जाळ्यातून आलो आहे,खेळियांच्या खेळ्यातून आलो आहे.
कुणाच्या खोकड चाळ्यातून आलो आहे,कुणाच्या माकड चाळ्यातून आलो आहे.मस्तावलेल्या बोकडांच्या ताब्यातीलगरीब शेळ्यांच्या ताब्यातून आलो आहे.
इथले सगळेच डावपेचमी कोळून प्यालो आहेमी आलो आहे...मी आलो आहे....॥२॥
कुचकट शेर्‍यातून आलो आहे,शनीच्या फेर्‍यातून आलो आहे.संधीसाधूंच्या डेर्‍यातून आलो आहेवांझोट्यांच्या बजबजपुर्‍यातून आलो आहे.
धर्म,जात,पंथ,भाषा,प्रांतयांच्या भेदक मार्‍यातून आलो आहे.राष्ट्रवादाला आव्हान देणार्‍याभेदक मार्‍यातून आलो आहे.
मलाच कळेना,मी पुढे जातो की,मागे मागे गेलो आहे....मी आलो आहे....मी आलो आहे ॥३॥
कोण काय खातो? हे बघत आलो आहे,कोण काय लेतो?हे बघत आलो आहे.गावकुसातल्या आतल्याबरोबरबाहेरचेही जग मी जगत आलो आहे.
मी नागणारे बघत आलो आहे,मी नागविणारे बघत आलो आहे.सुधारल्याचा आव आणीततसेच वागणारे बघत आलो आहे.
इथे कुणीच सांगत नाहीमी वाघाचे कातडे ल्यालो आहेमी आलो आहे....मी आलो आहे.....।४॥
कोंबड्यांच्या बांगेतून आलो आहे,एटीएमच्या रांगेतून आलो आहे.एकमेकांना मारलेल्यालाथाळ्या आणि टांगेतून आलो आहे.
मी नटसम्राटाच्या विंगेतून आलो आहे,मी हिटलरच्या झिंगेतून आलो आहे.गोमातेचे राजकारण करणार्‍याकठाळ्यांच्या जांघेतून आलो आहे.
तेहतीस कोटी देव दिमतीलातरी राक्षसांना भ्यालो आहे.मी आलो आहे....मी आलो आहे.....॥५॥
मी खालच्यातून आलो आहे,मी वरच्यातून आलो आहे.एकही शिल्लक उरला नसेल,मी मोर्चातून आलो आहे.
सगळ्यांच्या नाकाला झोंबणार्‍यामी मिरच्यातून आलो आहे.कुणी देश सोडा म्हणणार्‍यांसाठी,मी घरच्यातून आलो आहे.
रंगुन रंगात सार्‍यामी तिरंग्यात न्हालो आहे.मी आलो आहे....मी आलो आहे.....॥६॥
मला याड लागलं नाही,मला फ्याड लागलं नाही.किंगफिशरने मारली भरारीमला ग्वाड लागलं नाही.
मी झिंगून आलो आहे,मी पंगून आलो आहे.मी थोडाही सैराटलो नाही,मी रंगुन आलो आहे.
आर्ची आणि परश्याकधीच झालो आहेमी आलो आहे....मी आलो आहे..... ॥७॥
मी ब्लॅक मनीतून आलो आहे,मी व्हाईट मनीतून आलो आहे.दोन नंबरचे शिक्के लेवूनमी काळ्या गोण्यातून आलो आहे.
तिजोरीत जाऊन व्हाईट झालो आहे,कुणा-कुणाला वाईट झालो आहे.कुणा-कुणासाठी टाईट झालो आहे,मेरे देशवासियोंचा आवाज आवाज ऐकूनमीही दचकून गेलो आहे
मी आलो आहे....मी आलो आहे.....॥८॥
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-९९२३८४७२६९
दैनिक पुण्यनगरी । दैनिक झुंजार नेता१जानेवारी २०१७