रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

नव वर्षाची प्रार्थना






































क।वि।ता

नव वर्षाची प्रार्थना

नव्या आशा,नवी उषा,आसुसलो रे नव स्पर्शा ,
स्वागत करतो,स्वागत करू दे,येरे ये नव वर्षा || धृ ||
अनादी तू,अनंत तू,सृष्टीच्या कालगतीचा पंथ तू,
सामंजस्याने चालत राहू,आमच्या ओठी नको इर्षा ||१||
कितीदा येतो,कितीदा जातो,तोच आनंद पुन्हा होतो,
आनंद देवू ,आनंद घेवू,तुझ्यापुढे झुकवू शीर्षा ||२||
नवा श्वास तू,नवा सूर तू,नवी नवी हुरहूर तू,
नवे हर्ष तू,नवे वर्ष तू,घेवून येरे,ये तू हर्षा ||३||
पेलत राहू,झेलत राहू,संकटांशी बोलत राहू,
शक्ती-भक्तीची प्रेरणा,फक्त तुझिया स्पर्शा ||४||
अनुभवाची तू शिदोरी,घास घ्याया कुठली चोरी ?
रूपे तुझी वर्णू किती,शिशीर,हेमंत,शरद,वर्षा ||५||
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
दैनिक पुण्यनगरी।दैनिक झुंजार नेता
1जानेवारी 2018
---------------------------------------

शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

शुभ दसरा

शुभ दसरा
लुटालुटीची भाषा नको,
वाटावाटीची भाषा करूयात.
सिमोल्लंघन करायचेच तर
सहिष्णूतेची वाट धरूयात.
अद्यावत होणे म्हणजे
फक्त हुरळून जाणे नाही.
चांगल्या विचारांसारखे
दुसरे कोणतेच सोने नाही.
पारंपरिक शस्त्रे कितीही पुजा
शेवटी जुनी ती जुनी आहेत !
इष्ट-अनिष्टांचे नवे संदर्भ
ज्यांना ज्यांना कळाले,
ते सूज्ञ आणि ज्ञानी आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


शुक्रवार, २१ जुलै, २०१७

बीड जिल्हा अभिमान गीत


बीड जिल्हा अभिमान गीत

पराक्रमाची ओढ आम्हांला,अन्यायाची चीड हो
अभिमानाने गातो आम्ही,आमचा जिल्हा बीड हो।।धृ।।
पाठीवरती हात फिरविते,आमुची गोदामाई
सिंदफणेला सोबत घेवून,खळखळ वाही
बालाघाटच्या रांगेला या हिमालयाची ओढ हो ।।१।।
दासोपंतांच्या पासोडीची,श्वासात आ‘च्या ऊब
आद्यकवी मुकुंदराज इथले,ही अभिमानाची बाब
संतकवींचे अभंग इथले,अमृताहूनी गोड हो।।२।।
परळीच्या वैद्यनाथा,योगेश्वरीची साथ
खंडेश्वरीच्या हाती आहे,कंकालेश्वराचा हात
खजिना बावडीचे रहस्य सांगा?सवाल हा बिनतोड हो ।।३।।
आद्यक्रांतीच्या पेटल्या मशाली,इथल्या राना-रानात
रझाकारांची चीड होती,इथल्या मना-मनात
नेकनूरचा आंबा बोलवितो,चाखुन बघाया फोड हो।।४।।
नायगावच्या वनात नाचती,थुईथुई मोर
सौताड्याशी तुलना करते,कपिलधारची धार
अंमळनेरच्या पितळी भांड्या,नाही कुणाची जोड हो।।५।।
धारूरचा किल्ला सांगतो,इथला इतिहास सारा
इथेच घुमला होता,क्रांतीसिंहांचा नारा
घामाने भिजल्या काळ्या मातीला,कष्टाची उपजत ओढ हो ।।६।।
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
     मोबाईल-९९२३८४७२६९

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

माय मराठी

क।वि।ता

माय मराठी





















नव्या आशा-दिशांना
रोज धडकते मराठी.
नवनवी आव्हाने पेलत
रोज फडकते मराठी.

टाळ-चिपळ्या-मृदंगात
रोज दंगते मराठी.
लावणीच्या नवरंगात
रोज रंगते मराठी.

डफावरची थाप होवून
रोज कडाडते मराठी.
धडाडती तो होवून
रोज धडाडते मराठी.

पिडीतांचा आवाज होवून
रोज खणाणते मराठी.
शिवबाचा जयघोष करीत
रोज दणाणते मराठी.

ज्ञानभाषेची आस घेवून
रोज धडपडते मराठी.
कोवळ्या पंखांना बळ देवून
रोज फडफडते मराठी.

कॉम्प्युटरच्या किबोर्डवर
रोज नाचते मराठी.
भाषिक समन्वय साधीत
रोज पोचते मराठी.

क्रांतिकारकांच्या डरकाळ्या
रोज फोडते मराठी
दांभिकतेवर आसूड
रोज ओढते मराठी.

१०८ हुतात्म्यांचे गुणगाण
रोज गाते मराठी.
जात्यावरच्या ओव्या
रोज होते मराठी.

सण,उत्सव,जत्रा,ऊरूसात
रोज न्हाते मराठी.
कणाकणात,मनामनात
रोज वाहते मराठी.

आपापल्या बोलीभाषेत
रोज बोलते मराठी.
तरी प्रमाणभाषेचे आव्हान
रोज पेलते मराठी.

इकडे मराठी,तिकडे मराठी
श्वासा-श्वासात मराठी.
नाचू-गाऊ,लिहू-बोलू
रोज अभिजात मराठी !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
  मोबाईल-९९२३८४७२६९
दैनिक झुंजार नेता।27फेब्रुवारी2017


माय मराठी











































नव्या आशा-दिशांना
रोज धडकते मराठी.
नवनवी आव्हाने पेलत
रोज फडकते मराठी.

टाळ-चिपळ्या-मृदंगात
रोज दंगते मराठी.
लावणीच्या नवरंगात
रोज रंगते मराठी.

डफावरची थाप होवून
रोज कडाडते मराठी.
धडाडती तो होवून
रोज धडाडते मराठी.

पिडीतांचा आवाज होवून
रोज खणाणते मराठी.
शिवबाचा जयघोष करीत
रोज दणाणते मराठी.

ज्ञानभाषेची आस घेवून
रोज धडपडते मराठी.
कोवळ्या पंखांना बळ देवून
रोज फडफडते मराठी.

कॉम्प्युटरच्या किबोर्डवर
रोज नाचते मराठी.
भाषिक समन्वय साधीत
रोज पोचते मराठी.

क्रांतिकारकांच्या डरकाळ्या
रोज फोडते मराठी
दांभिकतेवर आसूड
रोज ओढते मराठी.

१०८ हुतात्म्यांचे गुणगाण
रोज गाते मराठी.
जात्यावरच्या ओव्या
रोज होते मराठी.

सण,उत्सव,जत्रा,ऊरूसात
रोज न्हाते मराठी.
कणाकणात,मनामनात
रोज वाहते मराठी.

आपापल्या बोलीभाषेत
रोज बोलते मराठी.
तरी प्रमाणभाषेचे आव्हान
रोज पेलते मराठी.

इकडे मराठी,तिकडे मराठी
श्वासा-श्वासात मराठी.
नाचू-गाऊ,लिहू-बोलू
रोज अभिजात मराठी !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
-मोबाईल-९९२३८४७२६९



बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

सरळ मान्य करा की, प्रेमामध्ये पडला आहात...
















मालिका वात्रटिका

सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...

स्वत:चा वेडेपणा बघून
स्वत:वरच चिडला आहात.
स्वप्नांचे पंख लावून
पिसासारखे उडला आहात,
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। १ ।।

कुणाशी तरी बोलून बोलून
मन हलकं हलकं होत आहे.
कंटाळा आला तरी
मन बोलकं बोलकं होत आहे.

जागेपणी स्वप्न पाहून
स्वप्नामध्येच पडला आहात.
दडविण्यासारखे काहीच नसतानाही
संकोचाने दडला आहात.
मग सरळ मान्य करा
प्रेमामध्ये पडला आहात...।। २।।

कुणाच्या तरी चाहूलीने
काळीज धडधडत आहे.
राहून राहून कानमध्ये
कुणीतरी बडबडत आहे.

स्वत:तच स्वत:ला डिस्टर्ब करून
स्वत:वरतीच चिडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ३ ।।

तुमच्या अंगाखांद्यावरती
मोरपिसं फिरत आहेत.
तुमच्या तना-मना‘ध्ये
फुलपाखरं शिरत आहेत.

इंद्रधनुचा गोफ करून
आकाशाशी भिडला आहात.
एक एक तारा तुम्ही
अलगदपणे खुडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ४ ।।

सगळं कसं नवं नवं,
वेगळं वेगळं वाटतं आहे.
सगळं कसं हवं हवं
आगळं आगळं वाटतं आहे.

गच्च धरलेला किनारा
केव्हाच सोडला आहात.
पोहता येत नसतानाही
पाण्यामध्ये पडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ५ ।।

स्वत:च्या नरड्याला गळा समजून
जाहीरपणे गुणगूणू लागलात.
आपलीच आपल्याला अक्कल पाजीत
उगीच भुणभूणू लागलात.

प्रत्येक स्पर्शामध्ये
स्वर्गाचा अर्थ काढता आहात.
ऐकूण घेणार्‍या प्रत्येकाच्या
डोक्याचा भुगा पाडता आहात.

मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ६ ।।

तुमचे जसे कळलेय,
तसे इतरांचेही कळत आहे.
आजूबाजूचा धूर सांगतोय
आत काहीतरी जळत आहे.

ओठांचा चंबू करून
नशेमध्ये बुडला आहात.
हव्या हव्याशा वाटणा‍र्‍या पिडेने
रात्रंदिवस पिडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ७ ।।

जड होते जीभ,
डोळे सारे काही ओकत आहेत.
तुमचा जल्लोष बघून
भोकणारे भोकत आहेत.

कविता-बिविता लिहून लिहून
कागदाचा फडशा पाडला आहात.
नेमकी खोली माहीत नसतानाही
खोल खोल बुडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ८ ।।

प्रेम बिम म्हटले की,
सगळ्यांचेच सारखे असते.
आभाळाहून मोठे अन
बारक्याहून बारके असते.

सगळे समजून येतेय तरी
कोड्यामध्ये पडला आहात.

गोड कोडे सुटू नये म्हणून
जाणीवपूर्वक अडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...।। ९ ।।

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-९९२३८४७२६९

पूर्वप्रसिद्धी-
दैनिक पुण्यनगरी
१४फेब्रुवारी२०१५

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

एका कवितेची कंदुरी






































एका कवितेची कंदुरी

मी शेळीच्या
करूण किंकाळीची
कविता केली,
अन ऐकवली कसायला !
तेंव्हा कसायाच्या
सुऱ्यासकट
त्याच्या डोळ्यातून
पाणी वाहिले !!
कसायाने थोपटली
माझी पाठ !
दिली प्रचण्ड दाद !
मग मी
हीच कविता
सोशल मीडियात
शेअर केली.
माझ्या कवितेपेक्षाही
कसायाच्या
दर्दीपणाला दाद मिळाली!
कसायाच्या
सुऱ्यालाही दाद मिळाली !
लाईक्स,शेअर,इमोजी
यात हरवली माझी कविता !!
जय कसाई
जय रसिक !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

रविवार, १५ जानेवारी, २०१७

नामदेवराव....



नामदेवराव....
तू
या दुनियेचे छिनालपण
आणि
बकालपण
सोलून दाखवलेस.
आणि कवितेला
कोणत्याच भाषेचा
विटाळ नस्तो
हे बिनधास्तपणे शिकवलेस.

हो मी केलीकॉपी तुझी
कारण तिच्यात
एक नशा आहे.
तुझ्या रांगड्या भाषेत
जग उलथून टाकण्याची
नेमकी दिशा आहे.

नामदेवराव,
माझ्यात तुझी
१ टक्का झलक
दिसली तरी
तू माझ्या
रक्तात भिनला आहेस
याचा अभिमान वाटतो.

माझ्यात येवू दे
तूझी ती पँथरजडीत
विनम्रता
जिने केले कौतुक...
ठासला दारूगोळा
योग्य
आणि नेमक्या वेळी.

नामदेवराव....
तू नव्हतास
वांझोटा कवी,
तू नव्हतास वांझोटा कार्यकर्ता !
म्हणून तर
तुझा वारसा
आजही धुमसतोय
वाडी-वस्ती
आणि महानगरा-नगरात !

नामदेववराव....
तुझ्या शब्दातली
आग जेवढी खरी.
त्यातली
आर्द्र्ता तेवढीच खरी !

नामदेवराव...
इथला प्रत्येक
रंजलेला-गांजलेला
इथला प्रत्येक
अडलेला-नडलेला
इथला प्रत्येक
नाकारलेला-ठोकारलेला
इथला प्रत्येक
धुसमूसणारा
इथला प्रत्येक
फुसफुसणारा
असतो जिवंत
नामदेव ढसाळ !!

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
१५जानेवारी२०१७
 --------------------------
 माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा..
https://surykanti.blogspot.in/

रविवार, ८ जानेवारी, २०१७

मॉंसाहेब आम्हांला माफ करा


मॉंसाहेब आम्हांला माफ करा

















क।वि।ता

मॉंसाहेब आम्हांला माफ करा

विसरून गेलोत इतिहास 
आम्ही विसरून गेलोत पराक्रम 
आमच्या डोक्यात पाणी झालेय 
त्याची तेवढी वाफ करा.
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा
तेच बोंबलत हिंडत आहेत.
घराघरातल्या आजच्या जिजाऊ
सासवांसोबत भांडत आहेत.

हे सारे बदलण्यासाठी
कुणातही टाप नाही. तुम्ही तेवढी टाप करा.
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....

घराघरातला शिवाजी
व्हिडीओ गेम खेळतो आहे.
जंक फुड खाऊन खाऊन
टि.व्ही.समोर लोळतो आहे.

घराघराचा कार्टून शो होतोय
हा बॅड शो तेव्हढा फ्लॉप करा
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
बाहेर खेळायला जावे तर
कुठे मावळ्यांचा पत्ता आहे?
साचलेल्या उकांड्यावरती
कावळ्यांचीच सत्ता आहे.

कॄपया , घर आणि डोक्यातले
उकांडे तेव्हढे साफ करा.
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
गनिमी काव्यासाठी तर
टि.व्ही.वाले लपलेले आहेत.
कोणताही चॅनल लावा,
सारे खानच खान टपलेले आहेत.

आमच्या चिकटलेल्या डोळ्यांची
जरा उघडझाप करा.
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
केस तेव्हडे वाढलेले,
पोकळ मात्र मस्तकं आहेत.
फार थोडी घरं सापडतील,
जिथे मुलांसाठी पुस्तकं आहेत.

आम्ही पापाचेच वाटेकरी
तरी होईल तेव्हढे पाप माफ करा 
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
राम-कृष्णांचा वारसा सांगुन
पुढच्या गोष्टी तुम्हांला
अगदी सोप्या करता आल्या.
इथली इरसाल लेकरं सांगतील,
आई-बापांच्या सहकार्यामुळेच
आम्हांला कॉप्या करता आल्या.

आई-बापांचेही खरे आहे,
कशाला म्हातारपणी ताप करा?
मॉंसाहेब,आम्हां ला माफ करा.....
 
तुमच्यासारखी आई असली की,
लेकरांना आपोआप 
स्वराज्याची शपथ घ्यावी लागते.
आज मात्र बळजबरीने पकडून,
कॉप्या न करण्याची शपथ द्यावी लागते.

आई-बापांचेही खरे आहे,
कशाला म्हातारपणी ताप करा?
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

तुमच्यासारखी आई असली की,
लेकरांना आपोआप
स्वराज्याची शपथ घ्यावी लागते.
आज मात्र बळजबरीने पकडून,
कॉप्या न करण्याची शपथ द्यावी लागते.

पुन्हा गुरुजी चुकले तर
त्यांच्या हाताचे काप करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

आंधळ्या परंपरेचे
इथे सगळे पाईक आहेत.
कित्तीही ओरडून सांगा,
सारे बहिरोजी नाईक आहेत.

किटलेल्या कानातला मळ
तेल ओतून साफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

राजेपद वारसा हक्काने मिळते,
पण शिवबा घडवावा लागतो.
जाणतेपणाचा दुर्मिळ गुण
दागिण्यासारखा जडवावा लागतो.

जरा मर्यादा सोडून वागतोय,
संभाजीसारखा नातू मागतोय.
आम्हांला तुमच्यासारखी आई,
शहाजी राजांसारखा बाप करा
माँसाहेब, आम्हाला माफ करा

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
..................
पूर्वप्रसिद्धी-
दै.पुण्यनगरी /दै.झुंजार नेता

सोमवार, २ जानेवारी, २०१७

सावित्रीचा वसा

















सावित्रीचा वसा

 ज्योतीबांची सावली बनुन
’यशवंत’ उभा करणे,
हा सावित्रीचा वसा आहे
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥धृ॥
सावित्री पोरीसारखी पोर होती,
सावित्री बाईसारखी बाई होती.
जेंव्हा रोग कळला,
रोगावरचा विलाज कळला,
तेंव्हा सावित्री दाई झाली,
तेंव्हा सावित्री आई झाली.
एकूणच सगळा प्रकार असा आहे
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?....॥१॥
चार भिंतीतला संसार
सावित्रीलाही करता आला असता.
’हम दो,हमारा एक’चा हट्ट
सावित्रीलाही धरता आला असता.
सत्यवादी सावित्री सरळ असली तरी
कर्मठ आणि दांभिकांच्या
गळ्यातला फासा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥२॥
ना शिकता सवरताही
संसाराची गाडी धकली असती.
सासर नावाच्या आभाळाला
सावित्री कशाला मुकली असती?
सावित्रीने केलेला विचार
आपण कशाला करू शकतो?
कारण तुमच्या आमच्या डोक्यात
भरलेला भुसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥३॥
घरात उभी गेलेली सावित्री
वेळोवेळी उभ्या उभ्या बाहेर आली.
ज्योतीबा नावाच्या योद्ध्याची
सावित्री वेळोवेळी ढाल झाली.
ती शिक्षणाचे दान देत राहिली,
ओढावून घेता येईल तेवढा दोष
ओढाऊन घेत राहिली.
आपला मात्र सदैवच
पसरलेला पसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥४॥
दगडाला भ्याली नाही,
शिव्या-शापालाही भ्याली नाही.
सावित्री नावाचे वाघिण
शेळी कधीच झाली नाही.
तुम्ही आम्ही शेळपट
सावित्री मात्र वाघिण होती,
कारण ज्योतीबाच तसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥५॥
सावित्रीलाही नटता आले असते,
सावित्रीलाही मुरडता आले असते.
अव्यवहारी नवरा म्हणून
ज्योतीबाला खरडता आले असते.
लष्कराच्या भाकर्‍या कशाला भाजता?
असे ओरडता आले असते.
पण सावित्रीचा धर्म
सांगा कुठे तसा आहे?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥६॥
सगळ्या कुलूपबंद व्यवस्थेची
शिक्षण हीच चावी होती.
ज्योतीबांना सावित्री मिळाली,
त्यांना जशी हवी होती.
सावित्री उर्जेची जन्मदात्री होती,
सावित्री कवयित्री होती.
आपला जोडा आहे का?
सावित्री-ज्योतीबाचा जसा आहे?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥७॥
सावित्री ज्योतीबांच्या सत्यधर्माची
जित्ता-जागता आरसा होती.
सावित्री ज्योतींच्या सत्यधर्माचा
जित्ता-जागता वारसा होती.
सावित्रीने दिलेली ललकार
आपल्याला देता येईल?
कारण सावित्रीचा तो कंठ,
आपला तो घसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥८॥
तुमची आमची परीक्षा
सद्यस्थिती पाहते आहे.
ज्योतीबा आणि सावित्री
नसा-नसातून वाहते आहे.
ते हे बोलू शकत नाहीत
ते हे पेलू शकत नाहीत
ते संकटांना झेलू शकत नाहीत,
ज्यांच्या अंगोपांगी ससा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥९॥
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-९९२३८४७२६९
दैनिक झुंजार नेता | दैनिक पुण्यनगरी
३जानेवारी२०१७