रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

माय मराठी











































नव्या आशा-दिशांना
रोज धडकते मराठी.
नवनवी आव्हाने पेलत
रोज फडकते मराठी.

टाळ-चिपळ्या-मृदंगात
रोज दंगते मराठी.
लावणीच्या नवरंगात
रोज रंगते मराठी.

डफावरची थाप होवून
रोज कडाडते मराठी.
धडाडती तो होवून
रोज धडाडते मराठी.

पिडीतांचा आवाज होवून
रोज खणाणते मराठी.
शिवबाचा जयघोष करीत
रोज दणाणते मराठी.

ज्ञानभाषेची आस घेवून
रोज धडपडते मराठी.
कोवळ्या पंखांना बळ देवून
रोज फडफडते मराठी.

कॉम्प्युटरच्या किबोर्डवर
रोज नाचते मराठी.
भाषिक समन्वय साधीत
रोज पोचते मराठी.

क्रांतिकारकांच्या डरकाळ्या
रोज फोडते मराठी
दांभिकतेवर आसूड
रोज ओढते मराठी.

१०८ हुतात्म्यांचे गुणगाण
रोज गाते मराठी.
जात्यावरच्या ओव्या
रोज होते मराठी.

सण,उत्सव,जत्रा,ऊरूसात
रोज न्हाते मराठी.
कणाकणात,मनामनात
रोज वाहते मराठी.

आपापल्या बोलीभाषेत
रोज बोलते मराठी.
तरी प्रमाणभाषेचे आव्हान
रोज पेलते मराठी.

इकडे मराठी,तिकडे मराठी
श्वासा-श्वासात मराठी.
नाचू-गाऊ,लिहू-बोलू
रोज अभिजात मराठी !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
-मोबाईल-९९२३८४७२६९



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा