शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

हे सत्यशोधका......

हे सत्यशोधका......

हे सत्यशोधका......
आमच्या मेंदूवरचा गंज
तुच घासून काढलास,
दांभिकतेच्या पाठीवर
तुच आसूड ऒढलास.
तुच शोधलेस शब्द हे शस्त्र आहे,
ते शस्त्रासारखेच वापरले पाहिजे.
तथाकथित धर्ममार्तंडाना ,
तथाकथित धर्मपालकांना
शब्दांनीच जोपारले पाहिजे.

हे सत्यशोधका.....
तुच सत्य शोधलेस,
धार्मिकतेपेक्षा
निर्मिकता महत्त्वाची आहे.
तुच शोधुन काढ्लेस,
परीवर्तनाची ज्योती
प्रथम घरात लावावी लागते.
बंडाची आग माणसामाणसात नाही,
ती उरात लावावी लागते.

हे सत्यशोधका.....
तुच दाखवलास
शिक्षण नावाचा स्वर्ग,
तुच शोधुन काढलास,
शत्रुच्या ह्रुदयपरीवर्तनाचा मार्ग.
भाकड्कथामधील खूळ !
कसे लागले बळीराजाला कुळ!
हे तु्च शोधुन काढलेस.

हे सत्यशोधका....
तु केवळ गायला नाहीस
शिवबाच्या पराक्रमाचा पोवाडा,
प्रथम तुच केलास
शिवबाच्या जाणतेपणाचा निवाडा !
महाराष्ट्राच्या अस्मितेची नाळ
जाणतेपणाशी जोडलीस.
बोलणारे बोलत राहिले,
पण वृत्ती नाही सोडलीस !

हे सत्यशोधका.....
तु खुल्या केलेल्या आडाचे,
महाडच्या चवदार तळ्याचे
शेवटी पांणी तर एकच आहे.
हे कळाले तर चांगले,
नाही कळाले तर ठीकच आहे.
तुच शोधुन काढलेस,
मुले जन्माला न घालताही
आईबाप होता येते.
दोन-चार जणांना द्यायचे सुख
सार्या दुनियेला देता येते.

हे सत्यशोधका......
शिक्षणाएवढेच
स्त्रीशिक्षणालाही महत्त्व दिलेस.
शिक्षणाच्या परीसस्पर्शाने
तिला आपले स्वत्त्व दिलेस !
तुझ्या सत्यशोधनामुळे,
तुझ्या सत्यबोधनामुळे
आम्हीच आमचा आरसा होऊ !
पेलवेल की माहित नाही?
आम्ही आमच्या कुवतीनुसार
तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

रविवार, ८ नोव्हेंबर, २००९

कवितांचा गर्भपात

कवितांचा गर्भपात

कविता जन्माला येत नाहीत
पूर्ण दिवस भरल्याशिवाय.
कविता घेतात त्यांचा पूर्ण काळ.

कविता लिहिण्याऐवजी
जेंव्हा कविता पाडली जाते,
खरं तर
हाच कवितांचा
गर्भपात असतो.

अशा गर्भपातीत कविता पाहिल्या की,
वाटते कवितांची भ्रूणहत्या....
थांबायला हवी !

नाहीतर नाळ
उगीच पुन्हा पुन्हा तोडावी लागते.

चला कवितांचे गर्भपात
आपण थांबवुयात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

रविवार, १ नोव्हेंबर, २००९

आंधळेबाजी

आंधळेबाजी

मी पाहिलेत
आंधळे उरावर घेऊन
भोवताली बघणारे
डोळ्यांवर पट्ट्या लावून
बाहेरख्याली वागणारे.

मी पाहिलेत
रात आंधळे
अन दिवस आंधळेही.
मी पाहिलेत
मेंदूला आंधळॆ करून
गोंधळ घालणारे
हौसे,नवसे,गवसे
गोंधळेही.

मी आणतो आव
चक्रधर असल्याचा
ते विचारतात,
तो हत्ती कुठे आहे?
पुन्हा बघायचाय आम्हांला.
ज्याने आम्हांला बदनाम केले.
मी नाही म्हणताच
माझे नाक कापायचे
षड्यंत्र
रचतात
असे आंधळेही.

हे आंधळे असे की,
तुकारामाला न्यायला आलेले
विमानही पाहू शकतात !
हे आंधळे असे की,
भूतदयेच्या नावाखाली
गाढवालाही पाणी पाजतील
पण
तहानलेला,भुकेला
माणुस यांना दिसत नाही.

ह्या आंधळ्यांची परंपरा
पृथ्वीच्या जन्मासोबतची.
ह्या आंधळ्यांची गर्दी
पक्की एकवटलेली.
हे आंधळे संघटीत झालेले,
हे आंधळे सगळीकडॆ घुसलेले,
हे आंधळे
अगदी जाणिवपूर्वक पोसलेले.
कुठेही जा,उघड्या डोळ्यांनी बघा
मोक्याच्या जागी बसलेले.

कुणी वांझोटेही
करू नयेत प्रयत्न.
त्यांना डोळस करण्याचे.
मात्र एक काळ्जी घ्या,
किमान आपल्या नव्या पिढीत
या आंधळ्यांनी
जन्म घेता कामा नये.
असे होत असेल तर
भ्रूण हत्येचे पापही करायला
मागे पुढे पाहू नका.
पापाचे प्रायश्चित काय ते नंतर बघु !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २००९

क्षितीज

क्षितीज

प्रिय,
तुला मला
आभाळाएवढं
मोठं झालेलं
बघायचय ना ?
मग तु
क्षितीज हो !
कारण क्षिताजाशिवाय
आभाळाला
मोठेपण
असतं का कधी?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)