रविवार, १ नोव्हेंबर, २००९

आंधळेबाजी

आंधळेबाजी

मी पाहिलेत
आंधळे उरावर घेऊन
भोवताली बघणारे
डोळ्यांवर पट्ट्या लावून
बाहेरख्याली वागणारे.

मी पाहिलेत
रात आंधळे
अन दिवस आंधळेही.
मी पाहिलेत
मेंदूला आंधळॆ करून
गोंधळ घालणारे
हौसे,नवसे,गवसे
गोंधळेही.

मी आणतो आव
चक्रधर असल्याचा
ते विचारतात,
तो हत्ती कुठे आहे?
पुन्हा बघायचाय आम्हांला.
ज्याने आम्हांला बदनाम केले.
मी नाही म्हणताच
माझे नाक कापायचे
षड्यंत्र
रचतात
असे आंधळेही.

हे आंधळे असे की,
तुकारामाला न्यायला आलेले
विमानही पाहू शकतात !
हे आंधळे असे की,
भूतदयेच्या नावाखाली
गाढवालाही पाणी पाजतील
पण
तहानलेला,भुकेला
माणुस यांना दिसत नाही.

ह्या आंधळ्यांची परंपरा
पृथ्वीच्या जन्मासोबतची.
ह्या आंधळ्यांची गर्दी
पक्की एकवटलेली.
हे आंधळे संघटीत झालेले,
हे आंधळे सगळीकडॆ घुसलेले,
हे आंधळे
अगदी जाणिवपूर्वक पोसलेले.
कुठेही जा,उघड्या डोळ्यांनी बघा
मोक्याच्या जागी बसलेले.

कुणी वांझोटेही
करू नयेत प्रयत्न.
त्यांना डोळस करण्याचे.
मात्र एक काळ्जी घ्या,
किमान आपल्या नव्या पिढीत
या आंधळ्यांनी
जन्म घेता कामा नये.
असे होत असेल तर
भ्रूण हत्येचे पापही करायला
मागे पुढे पाहू नका.
पापाचे प्रायश्चित काय ते नंतर बघु !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा