रविवार, १५ जानेवारी, २०१७

नामदेवराव....



नामदेवराव....
तू
या दुनियेचे छिनालपण
आणि
बकालपण
सोलून दाखवलेस.
आणि कवितेला
कोणत्याच भाषेचा
विटाळ नस्तो
हे बिनधास्तपणे शिकवलेस.

हो मी केलीकॉपी तुझी
कारण तिच्यात
एक नशा आहे.
तुझ्या रांगड्या भाषेत
जग उलथून टाकण्याची
नेमकी दिशा आहे.

नामदेवराव,
माझ्यात तुझी
१ टक्का झलक
दिसली तरी
तू माझ्या
रक्तात भिनला आहेस
याचा अभिमान वाटतो.

माझ्यात येवू दे
तूझी ती पँथरजडीत
विनम्रता
जिने केले कौतुक...
ठासला दारूगोळा
योग्य
आणि नेमक्या वेळी.

नामदेवराव....
तू नव्हतास
वांझोटा कवी,
तू नव्हतास वांझोटा कार्यकर्ता !
म्हणून तर
तुझा वारसा
आजही धुमसतोय
वाडी-वस्ती
आणि महानगरा-नगरात !

नामदेववराव....
तुझ्या शब्दातली
आग जेवढी खरी.
त्यातली
आर्द्र्ता तेवढीच खरी !

नामदेवराव...
इथला प्रत्येक
रंजलेला-गांजलेला
इथला प्रत्येक
अडलेला-नडलेला
इथला प्रत्येक
नाकारलेला-ठोकारलेला
इथला प्रत्येक
धुसमूसणारा
इथला प्रत्येक
फुसफुसणारा
असतो जिवंत
नामदेव ढसाळ !!

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
१५जानेवारी२०१७
 --------------------------
 माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा..
https://surykanti.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा