मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

बीड जिल्हा अभिमान गीत


बीड जिल्हा अभिमान गीत

पराक्रमाची ओढ आम्हांला,अन्यायाची चीड हो
अभिमानाने गातो आम्ही,आमचा जिल्हा बीड हो।।धृ।।

पाठीवरती हात फिरविते,आमुची गोदामाई
सिंदफणेला सोबत घेवून,खळखळ वाही
बालाघाटच्या रांगेला या हिमालयाची ओढ हो ।।१।।

दासोपंतांच्या पासोडीची,श्वासात आमच्या ऊब 
आद्यकवी मुकुंदराज इथले,ही अभिमानाची बाब
संतकवींचे अभंग इथले,अमृताहूनी गोड हो।।२।।

परळीच्या वैद्यनाथा,योगेश्वरीची साथ 
खंडेश्वरीच्या हाती आहे,कंकालेश्वराचा हात
खजिना बावडीचे रहस्य सांगा?सवाल हा बिनतोड हो ।।३।।

आद्यक्रांतीच्या पेटल्या मशाली,इथल्या राना-रानात
रझाकारांची चीड होती,इथल्या मना-मनात
नेकनूरचा आंबा बोलवितो,चाखुन बघाया फोड हो।।४।।

नायगावच्या वनात नाचती,थुईथुई मोर
सौताड्याशी तुलना करते,कपिलधारची धार
अंमळनेरच्या पितळी भांड्या,नाही कुणाची जोड हो।।५।।

धारूरचा किल्ला सांगतो,इथला इतिहास सारा
इथेच घुमला होता,क्रांतीसिंहांचा नारा
घामाने भिजल्या काळ्या मातीला,कष्टाची उपजत ओढ हो ।।६।।

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी-
दैनिक झुंजार नेता
8डिसेंबर2014

दीपावली शुभेच्छा