मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

कविता... रमाई


कविता

 रमाई

महाराष्ट्र माऊली तू, 
माझ्या भीमाची सावली तू. 
वादळातली बिजली म्हणून, 
रमाई, खरोखर भावली तू.

जशी सहचारिणी होतीस, 
तशी सहविचारधारिणी होतीस तू.
नैराश्य आलेच कधी तर, 
धैर्य आणि आशेची पेरणी होतीस तू.

जसा भीम तुला कळाला होता,
 तशी भीमाला कळालीस तू. 
मानवमुक्तीच्या यज्ञात, 
गोवरी होवून जळालीस तू.

भक्ती केलीस, शक्ती दिलीस, 
त्याग अन प्रीती दिलीस तू. 
भीम नावाच्या वादळाला,
 पुन्हा पुन्हा गती दिलीस तू.

भीम नावाचा हिरा, 
नेमकेपणाने हेरलास तू. 
भीम नावाचा दागिणा, 
कायम कपाळी कोरलास तू.

माझ्या भीमाईचा भीमाला, 
बाबा 'साहेब' बोललीस तू ! 
माझ्या भीमाची 'रामू' ही,
मोठ्या विश्वासाने पेललीस तू !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड) 
मोबा. ९९२३८४७२६९