कविता
-----------------------
प्रिय पुस्तकांनो..
मी तुमच्याशी खेळतो आहे,
तुमच्या कुशीत लोळतो आहे,
तुमच्यामुळेच मला,
जगण्याचा खरा अर्थ कळतो आहे.
तुम्ही मला युक्ती दिलीत,
तुम्ही मला शक्ती दिलीत.
तुम्ही मला भक्ती दिलीत,
अनिष्टावर घाव घालायला
तुम्हीच हाती सुक्ती दिलीत.
तुम्ही मला नवी दृष्टी दिलीत,
तुम्ही तुमची सृष्टी दिलीत.
ज्ञानाच्या वृष्टीसोबत
जे जे उदात्त, जे जे उत्तम
याला सतत पुष्टी दिलीत.
तुम्ही माझी छाया बनलात,
तुम्ही माझी काया बनलात.
वैचारिक पाया बनून
जग कोरडे वाटले तेंव्हा
तुम्हीच खरी माया बनलात.
रंग-रूप बदलले तरी
बदलण्यावर जाऊ नका,
कधीही नाराज होवू नका,
मी तर देणारच नाही,
पण तुम्ही अंतर देवू नका !
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबा. ९९२३८४७२६९
जागतिक
पुस्तक दिनाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
-सूर्यकांत डोळसे