सोमवार, ३० एप्रिल, २०१२

अभिमानाने गाऊ आपण महाराष्ट्र गाथा


झळकत आहे,झळकत राहिल,झळकत होता
अभिमानाने गाऊ आपण महाराष्ट्र गाथा !!धृ!!

समतेचा संदेश मनी बसवला बसवेश्वरांनी,
मानवतेचे नवे चक्र फिरवले चक्रधरांनी
यादवांच्या पराक्रमाने उंचावला देवगिरीचा माथा !!१!!

इथेच फुलुनि आला,भावभक्तीचा मळा,
पंढरीच्या वाळवंटी खेळला संतांचा मेळा
चांगदेवाची गुरू जाहली चिमुकली मुक्ता !!२!!

नामा,तुका,एका,रामदास रूजले मना-मनात,
शिवबाने फुंकला मंत्र मावळ्यांच्या काना-कानात
त्या मंत्राने लिहिली गेली स्वराज्याची कथा !!३!!

पराक्रमाचा इतिहास सांगती,पानिपतच्या लढाया,
अटकेपार झेंडे लावले,नाहीत या बढाया
हिमालय तुज साद घालतो,सह्याद्रीच्या सुता !!४!!

शेतकर्‍याच्या आसूडाने शोषणाचे सत्य शोधले,
ज्ञानाचे हे प्या हो अमृत ,साऊ-ज्योतिबा,शाहू वदले
प्रज्ञासूर्य भीमराव झाले शोषितांचे मुक्तीदाता !!५!!

कर्वे,आगरकर,गोखले,साठे,अत्रे,टिळक,
नव्या महाराष्ट्राची ही नवीन ओळख
गाडगेबाबांच्या साक्षीला राष्ट्रसंतांची ग्रामगीता !!६!!

माय आमुची मराठी,जरी ती  अभिजात नाही
मराठी  आमुचा बाणा ,तडजोड यात नाही
तुजविन आम्हा अस्तित्त्व नाही हे भारत माता !!७!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
     मोबा.९९२३८४७२६९



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा