अरे हे थांबवा रे.......
दिसली कविता की,
उगीच अभिप्राय ठोकुन दे.
छान,सुंदर,ग्रेट,झक्कास..
असे उगीच काहीही फेकुन दे.
.
प्रोत्साहन देणे म्हणजे
झाडावर चढवणे नसते.
आपल्यातला दिसला की,
राखीव ढोल बडवणे नसते.
.
हीला कविता कसे म्हणावे ?
हा साधा प्रश्नही पडत नाही .
खोट्या कौतुकाच्या पुढे
इथे काही काही घडत नाही .
.
शब्दापुढे शब्द मांडले की,
त्याची कविता होत नाही.
आतले बाहेर ओतल्याशिवाय
तिला कवितापण येत नाही.
.
मला दिसतेय कविता
गटा-गटात अडकते आहे.
बिचारी दर्जेदार कविताही
एखादा वाचक हुडकते आहे.
.
जग बदलतेय हे खरे तर
कवितेला बदल का रूचत नाही?
चाकोरीबद्ध विषयांशिवाय
दुसरी कविताच का सूचत नाही?
.
कोणी रोखीत नाही म्हणून
लिहायचे म्हणून लिहू नका.
आपल्याबरोबर शब्दांचा अन्
वाचकांचाही अंत पाहू नका.
.
लिहिणाराने लिहित जावे
त्याच्या काळज्या कुणा आहेत?
या रविकिरण मंडळाच्याच
पुन्हा नव्या पाउलखुणा आहेत.
.
मलाच हे समजावे,
एवढा मी काही शहाणा नाही.
दिसले तेच सांगतोय
यात कसलाही बहाणा नाही.
.
पटले तर होय म्हणा,
नाही तर आहे तसे चालू द्या.
शेवटी कविताच सांगते
मुक्यालाही शब्दाने बोलू द्या.
.
वाटले तर कवितांचे
आपण पाळणेही लांबवू शकतो !
आपल्यासाठी नाही पण
कवितेसाठी तरी हे थांबवू शकतो !!
.
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा