सोमवार, ११ एप्रिल, २०१६

हे सत्यशोधका





कविता
-------------------
हे सत्यशोधका......
हे सत्यशोधका......
आमच्या मेंदूवरचा गंज
तुच घासून काढलास,
दांभिकतेच्या पाठीवर
तुच आसूड ऒढलास.
तुच शोधलेस शब्द हे शस्त्र आहे,
ते शस्त्रासारखेच वापरले पाहिजे.
तथाकथित धर्ममार्तंडाना ,
तथाकथित धर्मपालकांना
शब्दांनीच जोपारले पाहिजे.
हे सत्यशोधका.....
तुच सत्य शोधलेस,
धार्मिकतेपेक्षा
निर्मिकता महत्त्वाची आहे.
तुच शोधुन काढ्लेस,
परीवर्तनाची ज्योती
प्रथम घरात लावावी लागते.
बंडाची आग माणसामाणसात नाही,
ती उरात लावावी लागते.
हे सत्यशोधका.....
तुच दाखवलास
शिक्षण नावाचा स्वर्ग,
तुच शोधुन काढलास,
शत्रुच्या ह्रुदयपरीवर्तनाचा मार्ग.
भाकड्कथामधील खूळ !
कसे लागले बळीराजाला कुळ!
हे तु्च शोधुन काढलेस.
हे सत्यशोधका....
तु केवळ गायला नाहीस
शिवबाच्या पराक्रमाचा पोवाडा,
प्रथम तुच केलास
शिवबाच्या जाणतेपणाचा निवाडा !
महाराष्ट्राच्या अस्मितेची नाळ
जाणतेपणाशी जोडलीस.
बोलणारे बोलत राहिले,
पण व्रुत्ती नाही सोडलीस !
हे सत्यशोधका.....
तु खुल्या केलेल्या आडाचे,
महाडच्या चवदार तळ्याचे
शेवटी पांणी तर एकच आहे.
हे कळाले तर चांगले,
नाही कळाले तर ठीकच आहे.
तुच शोधुन काढलेस,
मुले जन्माला न घालताही
आईबाप होता येते.
दोन-चार जणांना द्यायचे सुख
सार्या दुनियेला देता येते.
हे सत्यशोधका......
शिक्षणाएवढेच
स्त्रीशिक्षणालाही महत्त्व दिलेस.
शिक्षणाच्या परीसस्पर्शाने
तिला आपले स्वत्त्व दिलेस !
तुझ्या सत्यशोधनामुळे,
तुझ्या सत्यबोधनामुळे
आम्हीच आमचा आरसा होऊ !
पेलवेल की माहित नाही?
आम्ही आमच्या कुवतीनुसार
तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा