सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

बाबासाहेब एक संवाद



बाबासाहेब : एक संवाद बाबासाहेब, आरक्षणाचा विषय निघाला की, तुमची हमखास आठ्वण होते. तुम्ही आरक्षणाची भूमिका मांडली होती, पण तीला ठराविक मुदत घालायला विसरला नाहीत. विसरला नाहीत स्वंयपूर्णतेचा धडा शिकवायला. तसे तुम्ही बरेच धडे शिकवलेत. कारण शाळेतले बरेचसे ‘धडॆ’ तुम्हांला ‘डॉ.आंबेडकर’बनवायला कारण ठरले. तुमच्या स्पर्शाने फळ्यामागे ठेवलेल्या भाकरीही कशा बाटतात? हा प्रश्नच तुम्हांला ‘डॉ.आंबेडकरां’ पर्यंत घेऊन गेला. तुम्ही शिकलात आणि शिकविलेतसुद्धा पण आम्हीच कच्चे विद्यार्थी ! आवडतील फक्त तेच धडे आम्ही आज घोकतो आहोत. वाघिणीचं दूध पिऊन कुत्र्यासारखे भोकतो आहोत. आम्ही करतोय संघर्ष पण शत्रु कोण याचा पत्ता नाही. म्हणून आम्ही आमच्याशीच संघर्ष करायचे ठरविले आहे. आमचा शत्रू निश्चित होईपर्यंत ! तुम्ही सांगितलेले आम्हांला पटले शत्रुपेक्षा ‘संघर्ष’मोलाचा असतो. त्यासाठी आम्ही आमच्यातच शत्रुत्त्व निर्माण करून ठेवतोय... कारण शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा शिकवण तर ताजी टवटवीत राहिली पाहिजे ना? बाबासाहेब, तुमच्या धर्मांतरापेक्षा तुमची ‘मनुस्मृती’जाळण्याची घटना आमच्यासाठी एक ‘इव्हेंट’ठरलीय. त्याच ‘इव्हेंट’ची पारायणे आम्ही न चुकता साजरे करतो. आमच्यामुळे प्रकाशकांना पुन्हा पुन्हा मनुस्मृतीच्या आवृत्त्या काढाव्या लागत असतील ! जाऊ द्या बिचार्‍यांचाही तेवढाच धंदा होतो !! नाही तरी हल्ली पुस्तक-बिस्तक वाचतो कोण? तुम्ही आयुष्यातील पहिले कर्ज पुस्तकांसाठी घेतले होते, असे एकदा कानावर आले होते. ते आम्हीही जयंती मयंतीला सांगतो. अगदी टाळ्यांच्या कडकडाटात !! पण चुकून कधीही पुस्तकाला हात लावित नाहीत. मला सांगा, पुस्तकांनी कुठे पोट भरते का? पुस्तकावरच घसरलो तर.. पोटासाठी नामांतर चळवळ, पोटासाठी बाबासाहेबांचा विचार, पोटासाठी राजकीय दलाली, पोटासाठी जयंती-पुण्यतिथी, पॊटासाठी खास आपला एक मॉब, असे एक ना भाराभर विषय पडलेत की...! बाबासाहेब, तुम्ही म्हणाला होतात, " माझ्या चळवळीचा रथ मागे नेऊ नका" तुमच्या या विचारात काळाचा वेध घेण्याची किती प्रचंड ताकद होती! आम्ही हरामखोर निघणार आहोत हे तुम्ही तेंव्हाच ओळखले होते. मान लिया..... अधुनमधून भरकटल्याचा आमच्यावर आरोप होतो. तुम्हीच सांगा, आता चळवळीसमोर प्रश्न तरी आहेत का? मराठवाडा विद्यापिठाच्या नामविस्तारानंतर काही प्रश्न शिल्ल्क राहिलेत असे आम्हांला तरी वाटत नाही. कुणी चळवळीला वळवळ म्हणून हिणवतो, कुणी हसतो, कुणी चुचकारतो, कुणी वापरून घेतो, कुणी झुलवत ठेवतो.... शाळेत फळ्यावर गणित सोडविण्यासाठी तुम्ही उठलात आणि...... सवर्णांची पोरं भाकरी बाटू नयेत म्हणून भाकरीचे गठुडे उचलायला निघालेली पाहून तुम्हांला जेवढे दु:ख झाले होते, तेवढेच दु:ख क्षणाक्षणाला होते... पण आमच्यात ‘डॉ.आंबेडकर’ निर्माण होत नाहीत याची लाज वाटते. बाबासाहेब, तुमच्या विचारांचे राजकीय भांडवल करणारांविषयी मी तुमच्याजवळ तक्रारही करणार नाही. त्यांने केले नसते तर कुणी तरी केलेच असते ना? त्यांच्याविषयी तर मुळीच राग नाही. मुक्कामाचे ठिकाण एक असले तरी पोहचण्याची साधने वेगळी आहेत. आणि मार्गाचे विचारल तर.... सगळेच हवेत...सॉरी..... हवाई मार्गाने निघालेत. जमिनीचे भान कुणालाच नाही. कुणी तळ्यात,कुणी मळ्यात, कुणी स्वार्थाच्या खळ्यात. कुणाला खुणवतं नाही आकाळ निळं. कुणालाच आठवत नाही महाडचे चवदार तळं. वाघाचं गुरगुरणं आता रोजचे झालेय. स्वार्थासाठी मोर्चा, स्वार्थासाठी झुरणे कुणाच्या तरी पुढे लाळघोटेपणा करणे. बाबासाहेब, असे असले तरी आम्ही निराश नाहीत. कारण तुम्ही व्यक्ती नाहीत, तुम्ही विचार आहात. आणि विचारांना कधी मरण नसते ! अंधार दाटला आहे, विश्वास उठला आहे, गळ्यानेच आपला गळाही घोटला आहे. आता कुणाची वाट नाही, नेतेगिरीचा थाट नाही. आज नाही तर उद्या हे बदलणार आहे हे निश्चित ! त्यासाठी कुणाकडे आशेने बघायची गरज नाही. आतला आवाज सांगतो, बदलायला सिद्ध हो ! कारण तो महात्मा म्हणाला होता तूच सूर्य हो .... तूच बुद्ध हो .......!! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) मोबाईल क्रमांक-९९२३८४७२६९पूर्वप्रसिद्धी-दैनिक पुण्यनगरी १४एप्रिल २००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा