बुधवार, ४ मार्च, २०२६

कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला


कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला.

कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला, 
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला. 
कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला, 
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला. 

ज्याने दाखविले सत्य, त्याचे पाखंडी म्हणे कृत्य,
आम्ही सांगू तोच धर्म, आम्ही सांगू तेच सत्य, 
ज्याने दाखविले सत्य, त्याचे पाखंडी म्हणे कृत्य,
आम्ही सांगू तोच धर्म, आम्ही सांगू तेच सत्य, 
त्यांनी प्रत्येक सत्याग्रही बघा नड नड नाडीला.

कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला, 
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला. 
कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला, 
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला. 

सारे धर्माचे दलाल,करून घेती आपलीच लाल,
पुन्हा जुनेच षडयंत्र, पुन्हा बदनामीचीच चाल,
सारे धर्माचे दलाल,करून घेती आपलीच लाल,
पुन्हा जुनेच षडयंत्र, पुन्हा बदनामीचीच चाल,
सांगू ओळखावे कसे?उलटा तांब्या त्यांच्या गुढीला.

कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला, 
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला. 
कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला, 
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला. 

काय त्यांची धार्मिक खुण? धर्मासाठी पाडती खुन,
टाकाऊ विचारांना म्हणती, आमचं जुनं तेच सोनं,
काय त्यांची धार्मिक खुण? धर्मासाठी पाडती खुन,
टाकाऊ विचारांना म्हणती, आमचं जुनं तेच सोनं,
जो जाईल त्यांच्यापुढे,त्याचा अंगठा त्यांनी काढिला.

कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला, 
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला. 
कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला, 
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला. 

त्यांनीच काढले शोधून सारे, स्वर्ग आणि नर्क, 
नाही चालत त्यांना चर्चा,नाही चालत त्यांना तर्क.
त्यांनीच काढले शोधून सारे, स्वर्ग आणि नर्क, 
नाही चालत त्यांना चर्चा,नाही चालत त्यांना तर्क.
जित्याची खोड कशीच जाईना, काय करावे खोडीला?

कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला, 
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला. 
कुणी धाडीला धाडीला, थेट वैकुंठी धाडीला, 
समाधी समाधी म्हणून कुणी पाताळी गाडीला. 

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
 मोबा.9923847269

5 मार्च 20206

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

मराठवाडा माझा.....मराठवाडा गीत

। क । वि । ता ।
______________

मराठवाडा माझा......

चळवळीचा वारसा सांगतो
विचार होऊन कानी घोंगतो
मराठवाडा माझा.....

भक्ती-शक्तीला पुजतो आहे
उदात्त उत्तमता भजतो आहे
मराठवाडा माझा.....

संतस्पर्शाने पावन झाला
देता येईल ते देत आला
मराठवाडा माझा.....

आद्यक्रान्तीच्या पेटल्या मशाली
दुष्काळासही विचारी खुशाली
मराठवाडा माझा.....

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
  मोबाईल-9923847269
--------------------------------------
पूर्वप्रसिद्धी-
दैनिक पुण्यनगरी
17सप्टेंबर 2015
---------------------------------------
माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी 
क्लिक करा
suryakanti.blogspot.com

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

रानकवी ना. धों. महानोरयांना भावपूर्ण श्रध्दांजली!


रानकवी ना. धों. महानोर
यांना भावपूर्ण श्रध्दांजली!!

गांधारीचेही आटले डोळे, 
मूक झाली पळसखेडची गाणी. 
रानातल्या कविता गाते, 
आज व्याकूळ अजिंठ्याची लेणी.

जगाला प्रेम अर्पावे म्हणीत, 
आली दिवेलागणीची वेळ, 
या शेताने लळा लाविला, 
संपून गेला जिवंत शब्दखेळ,

सैरभैर झाले पक्ष्यांचे थवे, 
त्या आठवणींचा झाला झोका! 
निसर्गाच्याही काळजाचा,
आज चुकला असेल ठोका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) 
 मोबा. 9923847269
--------------------------
वात्रटिकांचे रोजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर आपोआप मिळण्यासाठी माझ्या *सूर्यकांती*  कम्युनिटीमध्ये  खालील लिंक वर क्लिक करून जॉईन होऊ शकतात. पोस्ट वाचाव्याआणि बघाव्या लागतील
कोणालाही कसलीही पोस्ट करता येणार नाही याची नोंद घ्यावी.मान्य असेलच इथे सामील व्हा. https://chat.whatsapp.com/GuS56N0ivoeHIwXIqoqllW-
- सूर्यकांत डोळसे 
3ऑगस्ट 2023

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

प्रिय पुस्तकांनो..

कविता
-----------------------
प्रिय पुस्तकांनो..
कळायला लागल्यापासून
मी तुमच्याशी खेळतो आहे,
तुमच्या कुशीत लोळतो आहे,
तुमच्यामुळेच मला,
जगण्याचा खरा अर्थ कळतो आहे.
तुम्ही मला युक्ती दिलीत,
तुम्ही मला शक्ती दिलीत.
तुम्ही मला भक्ती दिलीत,
अनिष्टावर घाव घालायला
तुम्हीच हाती सुक्ती दिलीत.
तुम्ही मला नवी दृष्टी दिलीत,
तुम्ही तुमची सृष्टी दिलीत.
ज्ञानाच्या वृष्टीसोबत
जे जे उदात्त, जे जे उत्तम
याला सतत पुष्टी दिलीत.
तुम्ही माझी छाया बनलात,
तुम्ही माझी काया बनलात.
वैचारिक पाया बनून
जग कोरडे वाटले तेंव्हा
तुम्हीच खरी माया बनलात.
रंग-रूप बदलले तरी
बदलण्यावर जाऊ नका,
कधीही नाराज होवू नका,
मी तर देणारच नाही,
पण तुम्ही अंतर देवू नका !
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबा. ९९२३८४७२६९
जागतिक
पुस्तक दिनाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
-सूर्यकांत डोळसे

 

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

कविता... रमाई


कविता

 रमाई

महाराष्ट्र माऊली तू, 
माझ्या भीमाची सावली तू. 
वादळातली बिजली म्हणून, 
रमाई, खरोखर भावली तू.

जशी सहचारिणी होतीस, 
तशी सहविचारधारिणी होतीस तू.
नैराश्य आलेच कधी तर, 
धैर्य आणि आशेची पेरणी होतीस तू.

जसा भीम तुला कळाला होता,
 तशी भीमाला कळालीस तू. 
मानवमुक्तीच्या यज्ञात, 
गोवरी होवून जळालीस तू.

भक्ती केलीस, शक्ती दिलीस, 
त्याग अन प्रीती दिलीस तू. 
भीम नावाच्या वादळाला,
 पुन्हा पुन्हा गती दिलीस तू.

भीम नावाचा हिरा, 
नेमकेपणाने हेरलास तू. 
भीम नावाचा दागिणा, 
कायम कपाळी कोरलास तू.

माझ्या भीमाईचा भीमाला, 
बाबा 'साहेब' बोललीस तू ! 
माझ्या भीमाची 'रामू' ही,
मोठ्या विश्वासाने पेललीस तू !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड) 
मोबा. ९९२३८४७२६९

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

हे आयुष्या...कविता

हे आयुष्या...
स्वत:साठी जगलो नाही,
स्वत:साठी जगणार नाही.
गमाईशी नाते माझे,
कमाईचे खाते बघणार नाही.
कधी झुकलो नाही,
कधीच झुकणार नाही.
वाट्टेल ती किंमत मोजून,
घेतला वसा टाकणर नाही.
हे आयुष्या,जे दिले तू मला:
त्यात कुठे कशाची कमी आहे?
तरी ना घरचा,ना दारचा,
ही जखम अश्वत्थामी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
10नोव्हेंबर2022

 

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

ग्रेस

ग्रेस
हे शब्दांच्या महाराजा,
तु नाकारलेस...
तुला दूर ठेवणारे.
भंपक, दांभिक,
अन तोंडदेखलेपणाला तु शिवला नाहीस.
तुझ्यातला कलंदरपणा माझ्यात उतरला..
हा वारसा जपतोय मी...
तु मला दहावीच्या मराठीत
'चिमण्या' घेऊन भेटलास
तेंव्हापासून पासून
तुझा शब्द काळजात.
कोरून ठेवीन.....
कविता कविची कमाई
नसते.
तुझ्यातला वारा नाही समजला..
समजणारही नाही.....
हे महाकवी
तु कवितेसकट 'तु अन
मोत्यांच्या अक्षरांसकट
माझ्यात उतरलास...
आता जबाबदारी माझी.....
कविता समजत कशी नाही ?
असा सवाल तुच करू शकतोस !
प्रशस्ती आणि पुरस्कारांसाठी
झुरला नाहीस....
कारण तु म्हणजेच
एक साहित्य अकादमी आहेस.......
याचा अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी
आणि
उजाडता पाठीवर ओझे वाटेपाशी तुझे डोळे यावे डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेठी !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबा. ९९२३८४७२६९
26 मार्च 2012

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

आई सिंधूताईसाठी...

आई सिंधूताईसाठी...

पोरक्या वासरांसाठी
हंबररणारी गाय गेली.
सिंधुताई गेल्या म्हणजे,
अनाथांची माय गेली.
अनाथ आणि सनाथांच्या,
काळजाला हा चरका आहे.
वत्सल गायीचा गोठा,
असा एकाएकी पोरका आहे.
सायीविना दूध उघडे,
दुधावरची साय गेली !
सिंधुताई गेल्या म्हणजे,
अनाथांची माय गेली!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
4जानेवारी 2022
-----------------------------------

 

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

भूकंपाच्या कविता

llभूकंपाच्या कविता ll

ll1ll

सारे भूकंप आता,
मसणवटा करणरे.
सारे जीव आता,
जीवनवाटा शोधणारे.

ll2ll
धरतीच्या अंगावरील,
झाली पीकांची आबाळ.
दारात मरणाच्या,
कुणा शोधतो बाळ?

ll3ll

जीवघेण्या भूकंपाची,
जीवघेणी थथर.
विसावल्या जीवाला,
नव्या पहाटेची फिकीर

ll4ll

धरतीत गडप झाला,
गावदेवाचा कळस.
लावू कुणाच्या दारात,
माझी मी तुळस?

ll5ll
भूकंपाच्या धक्कयाने,
नवसंसारांची लावली वाट.
आता कधी येणार?
उद्याची पहाट?

ll6ll

पोरक्या या गावात,
कुणा देवू मी धीर?
माझ्याही तिरडीला,
आता कितीसा उशीर?

ll7ll
थरथत्या काळोखात,
नको तुझी गं अनुकंपा.
किती दाबू मी आता,
काळजाच्या भूकंपा.

ll8ll

असा यावा पुन्हा भूकंप,
सारी व्हावी माती.
मग कोण विचारील,
कोण कुणाच्या जाती?

ll9ll

काय काय सांगू,
भूकंपाच्या कथा?
कशा कशा आवरू?
घरा-घराच्या चिता.

ll10ll

अरे भूकंपा भूकंपा,
आता नको पुन्हा येवू!
किती जेवलास आता?
दहाव्याची वाट नको पाहू !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा-9923847269
12ऑक्टोबर1993

(30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारीचा भूकंप झाला त्यानंतर विविध दैनिकात आलेल्या फोटोंचा आधार घेऊन लिहि


शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

गोपाला गोपाला म्हणीत गाडगे बाबा आले



कविता
------‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌--------------
गोपाला गोपाला म्हणीत गाडगे बाबा आले...
हातामध्ये खराटा त्यांच्या,डोई गाडगे ल्याले
गोपाला गोपाला म्हणीत गाडगे बाबा आले...।।धृ।।
रोज ठाव नवा,रोज गाव नवा,किर्तनातला भाव नवा
चिंधी लेवून अंगा,चिंधी बाबा आले ।।१।।
गावे झाडून,मने झाडून,लोक जागृत केले,
जागृत केले मेंदू आमचे,मडके बाबा आले।।।।
अज्ञानाला ठेचत आले,ज्ञानाला ते वेचत आले
दगडांचेही टाळ करूनी,डेबू बाबा आले।।३।।
कबिराला आणि तुकोबांला,त्यांनी बोलते केले
राष्ट्राला जागवित जागवित,राष्ट्रसंत हो आले।।४।।
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-९९२३८४७२६९
२३जानेवारी२०१८